वृक्षासन (vrikshasan)
तर गम्मत अशी की सकाळी पूर्वेकडे सूर्याला बघत वृक्षासन करताना माझ्या डोक्यात भलताच प्रकाश पडला. मी आपली मस्त लयीत पाय वर घेत आता हात वर घेऊन फायनल पोज मध्ये येणार तो नोटीस केलं की मी चक्क बाजूच्या भिंतीचा आधार घेतला होता. स्वतः च आश्चर्याने मग विचार करू लागले की असं कसं बरं? रोजच तर करतो आपण हे. पण दिवसात म्हणे काही ५०००० विचार येतात आपल्या डोक्यात मग एकाणेच तग धरला तर आकडा कसा पार होणार? तर असं कसं चा सवाल पूर्ण होईतो माझ्या मनाने मला उपमा दिली की 'यू क्रीपर'. वृक्षासनाचा अाता कधीच विसर पडला होता आणि स्वारी शवासनच करूच्या मूड मध्ये आलेली. पण त्या ५०००० हजारांची आगगाडी ग्रीन सिग्नल शोधून बसली होती बहुतेक.
एक फील घेते पुर्णपणाचा वृक्षासण करताना आणि तो आधाराला गेलेला हात पाहिल्यापासून स्वतःच स्वतःची थट्टा करत होते. डोक्यात आलं खरंच वेळेनुसार परिस्थितीनुसार किवा संगतीनुसर आपण असतोच कढी वृक्ष कधी झुडूप तर कधी वेल. खूप वेळा जेव्हा कोलमडून पडायची वेळ येते, थकवा येतो, अर्थ हरवून जातात… वेलीप्रमाने नाहिका आधार घेत आधार शोधत वाढण्याची धडपड करतो आपण. कधी कधी आपल्याच फुगलेल्या छोट्या विश्वात पूर्णत्वाची आणि संपूर्णतेची ग्वाही देतो आपण अगदी टाहो फोडून की कमावलं आता सगळ, जमवला आपला हिस्सा… झुडूप नाही का झालो अश्यावेळी. आणि कधीतरी खरंच एक पल्ला गाठू जिथं पुरून उरू स्वतः ला आणि छायेत येणाऱ्या वाटसरुलाही तेव्हा कुठेतरी पोहोचू… वृक्ष बनण्याच्या पात्रतेला.
#randomthoughts
Comments
Post a Comment